चार केंद्रांवर सायंकाळीही लांबच लांब रांगा
गंगापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १९ मतदान केंद्रांवर ६०.४८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानाचा ओघ मंद होता; मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. आमदार प्रशांत बंब यांनी लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
गंगापूर तालुक्यात एकूण ८ हजार ८३६ मतदारांची नोंदणी होती. यामध्ये ६ हजार ८७० पुरुष आणि १ हजार ९६६ महिला मतदारांचा समावेश होता. दुपारी चार वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार ५ हजार ३४२ मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये ४ हजार ३३६ पुरुष आणि १ हजार ६ महिला मतदारांचा समावेश होता. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ६३.१, तर महिला मतदारांची ५१.१७ टक्के होती.
मतपत्रिकेचा आकार मोठा असल्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत होता. त्यामुळे जामगाव, आसेगाव, भेंडाळा आणि शेंदूरवादा येथील मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेसहानंतरही मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार सचिन बाघमारे, मुख्याधिकारी संतोष आगळे, तलाठी गणेश लोणी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर, गंगापूरचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-- मतपत्रिकेमुळे मतदानास विलंब --
मतपत्रिका आकाराने मोठी असल्याने मतदानासाठी अधिक वेळ लागत होता. परिणामी, जामगाव, आसेगाव, भेंडाळा आणि शेंदूरवादा येथील मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेसहानंतरही मतदारांच्या लांबच लांब रांगा कायम होत्या.
-- जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्राला भेट --
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षण अधिकारी डॉ. माधवी कुळे-चवरे यांनी गंगापूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.















